मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवा :पालकमंत्री गुलाबराव पाटील
तालुकानिहाय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश!
जळगांव प्रतिनिधी दि. ६ : चोपडा,पाचोरा,भडगाव येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापनेबाबतच्या अधिसूचना शासनाने जारी केले असून लवकरच सदर महामंडळ स्थापन होणार आहे तसेच धरणगाव येथे उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली जाणार असून या बाबत लवकरच प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. युवा वर्गात उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी सर्वसमावेशक स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणारी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. ते जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी, सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करुन स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करुन सुक्ष्म व लघु उपक्रम स्थापित करणे हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) योजनेचा उद्देश आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच शासनाने जिल्ह्यासाठी मुख्य मंत्री रोजगार निर्मितीचे ४९५ तर पंतप्रधान रोजगार निर्मितीचे १४४ उद्दिष्ट मुदतीत साध्य करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या
प्रास्ताविकात जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर.आर. डोंगरे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविण्यात येत आहे. राज्यात त्यामुळे सुक्ष्म व लघु उपक्रम स्थापित करून त्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
*उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश!*
यावर्षी covid-19 सारख्या महामार्गामुळे बेरोजगार झालेल्या नागरिकांसाठी रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 15 तालुक्यात रोजगार युक्त करण्यासाठी याद्वारे उद्योग व्यवसाय वाढीस चालना देण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम तालुकानिहाय राबविण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सावंत,जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , आ.चंद्रकांत पाटील, मा. आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, एम.आय.डी.सी. चे क्षेत्र व्यवस्थापक डी.जी. पारधी, जिल्हा उद्योग चे व्यवस्थापक आर.आर.डोंगरे,खादी ग्राम उद्योगाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाळकृष्ण चौधरी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे आनंद विद्यागर , समीर भाटिया , दिनेश गवळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment