जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र -आयोजित भविष्यावर बोलू काही ..
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र -आयोजित :-भविष्यावर बोलू काही .. या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील 18 वर्ष वयाखालील विविध 55 शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहामध्ये दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी दुपारनंतरच्या सत्रात करण्यात आले होते...
या कार्यशाळेसाठी ठाणे शहरातील 2000 विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक यांचीही उपस्थिती लाभली .. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ठाणे शहरातील नगरपालिका किंवा अशा शाळा निवडल्या गेल्या ज्यात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकतात आणि ह्या तळागाळातील सर्वसामान्य घटकातील मुलांना भविष्यातील विविध संधी, करिअरच्या विविध वाटा आणि प्रेरणादायी विचार व मार्गदर्शनपर व्याख्यान अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती..
या मार्गदर्शनपर कार्यक्रमात मा.श्री.निलेश सांबरे, मा.श्री.गणेश शिंदे ,मा.श्री.संदीप पाटील (स्वयंदीप प्रतिष्ठान) मा.श्री.कैलासजी महापती या प्रमुख वक्त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले ..ज्यामध्ये मी करियर या विषयावर मुलांशी संवाद साधला..मा.श्री.गणेश गावडे(DCP),श्री.केदार दादा चव्हाण व सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परेश कारंडे यांनी केले..
आदरणीय निलेशजी सांबरे हे आपल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोकणातील पाचही जिल्ह्यात समाज सक्षमीकरणाचं काम पंचसूत्री प्रमाणे करतात यामध्ये शिक्षण ,आरोग्य ,रोजगार ,शेती आणि महिला सक्षमीकरण या महत्त्वाच्या घटकांसोबत याला पूरक असलेले इतर उपघटक यांच्यावर केंद्रित सर्व स्तरावर अविरत काम करणारी महाराष्ट्रातील ही एक अग्रगण्य संस्था आहे आणि गेल्या आठ वर्षापासून या संस्थेच्या या आदर्शवत कार्यात मला खारीचा वाटा उचलता येतो हे मी माझे भाग्य समजतो..
औपचारिक शिक्षण क्षेत्रासोबतच(CBSC स्कूल आणि जूनियर कॉलेज) ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण, स्पोर्ट्स अकॅडमी, महिला उद्योजकता प्रशिक्षण ,मतिमंद अपंग शाळा, निशुल्क उपचारासाठी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि ग्रामीण भागातील मुलांना सुसज्ज अशा 40 होऊन जास्त अभ्यासिका हेही उपक्रम जिजाऊ च्या माध्यमातून निशुल्क व अखंडित चालू आहेत.
विशेषत:आदरणीय निलेश सांबरे साहेबांच्या स्व कमाईतून अनेक स्तरावर काम करणारी ही अशी संघटना आहे की जी समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी सर्वच क्षेत्रात काम करते..जिजाऊ ची एक स्वतंत्र कार्यक्षम यंत्रणा आहे जी अगदी शहरांपासून ते गावा खेड्यापर्यंत नव्हे तर वाड्या वस्तीपर्यंत विस्फारलेली आहे.. या सर्व कार्याचे फलित म्हणून पुढील काही वर्षांमध्ये कोकणातील या पाच जिल्ह्यात विद्यार्थी व तरुण विविध क्षेत्रात यशस्वी होताना दिसतील.. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध शासकीय पदांवर यश संपादन केलेले आहेच आणि त्यानंतरची फळी जिजाऊ च्या माध्यमातून तयार होते आहे..
Comments
Post a Comment