मराठी शाळेच्या सुधारणा काम संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - उपस्थित झालेले 9 प्रश्न

स्वयंदीप प्रतिष्ठानने डांभुर्णी प्राथमिक शाळेच्या सुधारणा कामी आर्थिक योगदान दिलेल्या तसेच जिल्हा परिषद सदस्य तसेच इतर प्रशासकीय अधिकारी ज्यांचे या कामात महत्त्वाचे सहकार्य आहे अशा सर्व मान्यवरांचा पूर्वनियोजित सत्काराचा कार्यक्रम आज म्हणजे 23 मार्च रोजी अकरा वाजता मराठी शाळेत होणार होता ,मात्र या कार्यक्रमाला श्रेय वादाचा रंग देऊन प्रसारमाध्यमात तसेच सर्वसामान्य जनता यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होतो आहे.त्याची सत्य व असत्य बाजू काय? हे मांडण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यासंदर्भात खालील 9 मुद्दे.

1)ग्रामपंचायत डांभुर्णीशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक व शाळेचे मुख्याध्यापक यांना मौखिक व लेखी स्वरूपात सत्कार समारंभाचे माहिती मी स्वतः तसेच लेखी निवेदन डांभुर्णी ग्रामपंचायत सदस्य श्री शुभम विसवे यांनी दिलेली आहे. त्याची पोचपावती देखील आमच्याकडे आहे, तरी अशी कोणतीच माहिती सरपंचांना किंवा ग्रामपंचायतला नाही असे खोटे कारण दाखवून व मुख्याध्यापकांवर दबाव आणून चुकीच्या आशयाचे पत्र देण्याचे व त्या माध्यमातून कार्यक्रम होऊ नये यासाठी दडपशाहीचे धोरण वापरण्याचे काय कारण असावे?

असाच प्रकार शिवजयंती व्याख्यानमालेच्या दरम्यान श्री. भास्करराव पेरे पाटील यांनी गावात येऊ नये यासाठी देखील करण्यात आलेला होता .

2) डांभुर्णी प्राथमिक शाळेच्या सुधारणेसाठी लोकसहभाग जो स्वयंदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला आहे तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य नानासाहेब आर.जी.पाटील यांनी शाळेला पत्रे दिली आहे ,संरक्षण भिंतीसाठी स्वयंदीपच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून आणि श्री.किशोर राजे निंबाळकर तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या विशेष सहकार्याने दहा लाख रुपये मिळाले आहेत .तसेच प्राथमिक शाळा डिजिटल करणेकामी अँड्रॉइड टीव्ही देखील स्वयंदीप प्रतिष्ठानने दिला आहे मग ही जी सुधारणा झाली त्यात ग्रामपंचायतीने नेमके कोणते कार्य केलं?

3) म्हणजे जर सर्व कामे जर लोकसहभाग तसेच जिल्हा परिषद सदस्य ,जिल्हा नियोजन समिती, पंचायत समिती यांच्या माध्यमातून झाली तर मग आराखड्यात मंजूर साडेसात लाख शैक्षणिक विकास निधी ग्रामपंचायत ने कुठे व कसा खर्च केला?

4) संरक्षण भिंत संपूर्ण शाळेला पाहिजे त्यासाठीच जिल्हा नियोजन समितीमधून 1000000 मिळाले होते मग फक्त दर्शनी भागातच भिंत बाकी बाजूला तारेचे कुंपण असे का करण्यात आले आणि बाकी निधी कुठे वळवला?

5) स्वयंदीप प्रतिष्ठानने शैक्षणिक चळवळ उभी केली आणि त्या माध्यमातून जो लोकसहभागातून निधी जमवला (545000)तो  तत्कालीन सरपंच यांनी स्वयंदीप च्या खात्यावर टाकण्यास नकार देऊन ,परस्पर स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर टाकण्यात आला तसेच त्याचा लेखाजोखा ही कुठेच प्रसिद्ध करण्यात आला नाही असे का करण्यात आले? हा लेखाजोखा अनेकदा शाळेच्या ग्रुप मागण्यात आला तरी अजूनही दिलेला नाही असे का?

6) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रसार माध्यमे यांना खोटी माहिती देऊन शासन, प्रसारमाध्यमे व ग्रामस्थ यांची दिशाभूल का केली जाते आहे? असं नसतं तर जिल्हा परिषदेचे मा.सदस्य श्री.नानासाहेब आर.जी.पाटील यांनी स्वतः शाळेत येऊन संबंधितांची कानउघडणी का केली असती?

7) शाळा सुधारणा कार्याला सुरुवात करण्या वेळी ज्यांनी स्वयंदीप कडे हा प्रकल्प हाती घेण्याची सूचना मांडली ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री संजय दत्तात्रय सोनवणे यांनी स्वतः पाहणी केली व तांत्रिक व पायाभूत सुधारणा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. एवढेच नव्हे तर या कामासाठी योग्य व अनुभवी  कंत्राटदाराला देखील सोबत आणून त्याने हे काम करावे असा विचार मांडला होता.कारण हा प्रकल्प योग्य पद्धतीने व योग्य वेळेत पूर्ण व्हावा असा या मागचा हेतू होता परंतु तत्कालीन सरपंच यांनी परस्पर या कंत्राटदार बदलून दुसरा कंत्राटदाराला हे काम का दिले?

8) शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने 2010 मध्ये जी नवीन नियमावली प्रसारित केली त्यानुसार प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक विकासा संदर्भात जो काही निधी लोकसहभागाचा असेल किंवा शासकीय आशा सर्व बाबींच विनियोजन, खर्च मंजुरी, प्रत्यक्षात खर्च  करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे ,मग तत्कालीन सरपंचानी तो स्वतःच्या वैयक्तिक खात्यात कसा वळवला. संबंधित व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणजे मुख्याध्यापकांना या बाबतीत कुठलीही कल्पना नाही किंवा त्यांच्याकडे लेखी स्वरूपात कुठलाच दस्तऐवज का नाही ? तसेच समितीच्या स्थापनेतही अनियमितता दिसते या बाबतीतही चौकशी व्हावी

9) शाळेच्या सुधारणा कार्यात योगदान दिलेल्याचा सत्कार करणे यात सहभागी होण्या ऐवजी याला षडयंत्र म्हणणे या कार्यक्रमाचा अपप्रचार करणे हे कितपत योग्य आहे?
स्वयंदीप प्रतिष्ठान- डांभुर्णी

Comments

Popular posts from this blog

नवीन वीज मिटर घेण्यासाठी लाच घेतांना वीज मंडळाचा वायरमन जळगाव एसीबी पथकाच्या हाती रंगेहात सापडला.

अनिल कुंबळेच्या जागी सौरव गांगुलीची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस जनता कर्फ्यु : जिल्हाधिकारी अभिजित राऊत